सध्या एकीकडे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे राज्य सरकार अस्थिर करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे आज संध्याकाळी ४ वाजता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं दिसत आहे.

दरम्यानच्या काळात सत्तास्थापनेच्या वेळीही मातोश्रीची पायरी न चढलेल्या शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळेच राजकीय चर्चांना सोमवार संध्याकाळपासूनच उधाण आलं आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागणार का यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.

सोमवारी मतोश्री या उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये दीड तास चर्चा सुरु होती अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. सोबतच कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मात्र असं असलं तरी राज्यपालांच्या भेटीसाठी नेत्यांची रांग लागल्याने, महाराष्ट्र भाजपाने सरकारविरोधी आंदोलन सुरु केल्याने आणि त्यातच राणेंनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. करोनाची परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडीचं सरकार अपयशी ठरल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सतत विरोधीपक्षाकडून करण्यात येत आहे. त्यातच यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा रंगलेल्या परिस्थितीवरूनही विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे ते या पत्रकार परिषदेत काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.