माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. दरम्यान. या निमित्तानं भाजपानं कार्यकर्त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस २२ जुलै रोजीच असतो. त्यांनीदेखील यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं पक्षाचे कोणतेही नेते / कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. वृत्तपत्रातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत. असं केल्यास तो पक्षशिस्तीचा भंग मानण्यात येईल. उत्सवाप्रमाणे कोणताही कार्यक्रम न करता केवळ सेवाकार्यात योगदान द्यावं, असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.

होर्डिंग, बॅनर, जाहिराती असं कुणीही केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं असं भाजपानं म्हटलं आहे. तसंच यंदा करोनामुळे आपण अनेक संकटांना तोंड देत आहोत. अशात भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यांना योगदान द्यायचं आहे त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावं, असंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.