राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीतही विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील निरनिराळ्या भागांचे दौरे करत आहेत. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्राकडे म्हणजेच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे एक भावूक विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. “जर मला करोनाची लागण झालीच तर मला सरकारी रुग्णालयातच दाखल कर,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह गिरीश महाजन यांनीदेखील राज्यातील अनेक भागांचा दौरा केला. यादरम्यान, त्यांच्यात झालेल्या संभाषणाबद्दल गिरीश महाजन यांनी उलगडा केला. सरकारनामानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “राज्यातील सर्वसामान्य जनतेला उपचार मिळत नाही. परंतु नेतेमंडळी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. ही परिस्थितीत पाहिल्यानंतर आम्ही राज्यातील अनेक ठिकाणच्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी अनेकांनी कोविड रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या,” असं महाजन म्हणाले.

“करोनाची लक्षणं नसतानाही काही नेते मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. हे चित्र वाईट आहे. यासंदर्भात आमची चर्चा सुरू असतानाच फडणवीस म्हणाले गिरीश मला कोविडची लागण झाली तर मला खासगी रुग्णालयात दाखल करू नको. मला सरकारी रुग्णालयात दाखल कर. याचं मला वचन दे,” असं फडणवीस म्हणाल्याचे त्यांनी सांगितलं. “राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असतानाही कोणताही मंत्री फिरत नाही. तर मुख्यमंत्रीही घरातच बसले आहेत. फडणवीस, दरेकर आणि मी राज्यभर फिरत आहोत. राज्यात परिस्थिती बिकट असून रुग्णांची दखलही घेण्यास कोणी तयार होत नाही. नेत्यांना करोना झाला तर ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत. त्यांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास नाही का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो,” असंही महाजन म्हणाले.