सातारा येथील सदरबझार परिसरात व्यवसायाचा फलक लावण्यावरून एकाला बेदम मारहाण करत हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका माजी नगरसेवकासह एकाला ताब्यात घेतले आहे. महेश जगताप असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली यामुळे परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

विक्रम रसाळ यांच्या व्यवसायाचा फलक लावण्यावरून एका डॉक्टरांबरोबर त्यांचा वाद सुरू होता. यामध्ये संबंधित डॉक्टरांची बाजू घेत जगताप यांनी रसाळ याला दमदाटी करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत  हवेत गोळीबार केला. याबाबत रसाळ यांनी तक्रार दाखल केली असून जगताप यांना अटक केली असून सोमवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ त्या परिसराची नाकेबंदी करून घटनेची प्राथमिक माहिती घेण्यास सुरुवात केली. संशयित माजी नगरसेवक महेश जगताप याला ताब्यात घेतले असता अन्य एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून त्याचे नाव समजू शकले नाही. रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात त्यांना आणून त्यांची चौकशी करण्याचे काम सुरू होते.