“देशातील सर्वांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास विजेची मागणी एकदम कमी होईल. आधीच (लॉकडाउनमुळे कंपन्या बंद असल्याने) वीजनिर्मिती आणि मागणी याचं गणित बिघडलं आहे. जर सर्वांना एकाच वेळी लाइट बंद केले तर परिस्थिती अजून बिकट होईल. एवढ्या लोकांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास राज्यातील तसेच केंद्रीय ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर निकामी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा विधानांचा पुनर्विचार व्हावा,” अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर दिली होती. यावरून आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या टीका करत ते जनतेची दिशाभूल करत असल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी शुक्रवारी यासंबंधी घोषणा केली. त्यामुळे नियोजनासाठी सरकारकडे पुरेसा वेळ आहे. ऊर्जामंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. मी यापूर्वी पाच वर्ष ऊर्जामंत्री म्हणून काम केलं आहे. या वक्तव्यातून उगाच जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात आला. यासाठी नॅशनल ग्रीड मेंटेन करणाऱ्यांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे आणि हे मॅनेजेबल आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- देश रात्री दिवे चालू ठेवून झोपतो का? राम कदमांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

ग्रीडमध्ये मिनिट ते मिनिट लोड मॅनेजमेंट होतं. त्यात कोणीही काहीही बदल केला तर तो दिसून येतो. दिव्यांचा वीजभार फार कमी असतो. त्यांनी एसी, पंखे बंद करायला सांगितले नाही. त्यामुळे यावर कोणीही राजकारण करू नका असंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “…तर संपूर्ण राज्य आणि देश एका आठवड्यासाठी अंधारात जाईल”; राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली भीती

काय म्हणाले राऊत?
“सद्य परिस्थितीत महाराष्ट्राची मागणी २३ हजार मेगावॅट वरून १३ हजार मेगावॅटवर आलेली आहे. लॉकडाउनमुळे इंडस्ट्रियल लोड पूर्णतः शून्य आहे. १३ हजार मेगावॅट हे फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फिक्वेन्सीवर ट्रिप होतील. संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्रसारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टी स्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील. एक पॉवर स्टेशन सर्विसमध्ये यायला साधारण १६ तास लागतात याप्रमाणे सर्व परिस्तिथी नॉर्मल व्हायला साधारण एक आठवडा जाईल. म्हणून मला जनतेला सल्ला द्यायचा आहे. आपण करणाऱ्या या कृतीचा पुनर्विचार करावा आणि करोनाविरुद्धच्या युद्धामध्ये वीज हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या वीजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं,” असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.