सत्ता आली की माणसं कशी बदलतात हे शिवसेनेकडे पाहून समजतं. कारण साध्या व्हॅलेंटाइन डे ला विरोध करणारी शिवसेना आणि जोडप्यांना मारझोड करणारी शिवसेना आज लव्ह जिहादच्या मुद्द्यावर जी भूमिका घेते आहे ती भूमिका त्यांच्या अधःपतनाचा वेग दर्शवणारी आहे असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. २०१४, १५ आणि १६ मध्ये शिवसेनेने व्हॅलेंटाइनबाबत घेतलेली भूमिका, केलेली आंदोलनं आठवा. संजय राऊत यांनी सामनात लिहिलेले अग्रलेख आठवा. आता सत्ता आल्यानंतर सगळं बदललं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपुरात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

हे पण वाचा“ईडी’च्या धाडी टाकून सरकार बनवता येईल असं मानणारे मूर्ख”

लव्ह जिहादचा कायदा बिहारमध्ये झाला तर महाराष्ट्रात करु असंही संजय राऊत म्हणाले होते त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बिहारमध्ये जे काही होणार आहे ते हे करणार आहेत का? आश्चर्याची बाब ही आहे की एवढा प्रगत महाराष्ट्र आहे आणि तरीही यांना बिहारचं अनुकरण करावंसं वाटतंय? सत्ता आल्यावर माणसं कशी बदलतात याचं हे उदाहरण आहे” हे सरकार पडण्याची आम्ही वाट बघत नाही. हे सरकार आपल्या वजनाने पडेल असलं सरकार चालत नसतं. हे सरकार ज्यादिवशी पडेल त्यावेळी आम्ही सरकार स्थापन करु असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावर जी कारवाई झाली त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपाला शिखंडीची फौज असं म्हटलं आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की ”संजय राऊत यांच्यापेक्षाही खालच्या शब्दांमध्ये आम्हाला बोलता येतं. आम्ही घरी बसलेले लोक नाही. आम्हालाही खालच्या शब्दांमध्ये उत्तर देता येतं. मात्र आमची ती संस्कृती नाही.. आणि मुळात असे शब्द कधी वापरले जातात? जेव्हा मनात कुठेतरी भीती असते तेव्हा असे शब्द वापरले जातात. आम्ही आमच्या पद्धतीनेच उत्तर देऊ कारण आम्ही सुसंस्कृत आहोत. “