माजी महापौर नलिनी चंदेले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु काही दिवसांतच त्या पुन्हा स्वगृही परतल्या. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत चंदेले यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला.
दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नुसिंग चंदेले यांच्या स्नुषा असलेल्या नलिनी चंदेले यांनी विदर्भात आपल्या माहेरी म्हणजे चिमूर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केला होता. परंतु भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे त्यांनी पुन्हा सोलापूर गाठून काँग्रेसमध्ये प्रवेश घेणे पसंत केले. सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी २००९ साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी चंदेले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द दिला होता. परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. यातच शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी चंदेले यांचा दुरावा निर्माण झाला होता. भाजपमध्ये प्रवेश घेऊन पश्चात्ताप झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.