राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असंही आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी दाखल होणार आहे असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना आणि त्यांच्या मुलीलाही करोना संसर्ग झाला. रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली होती. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसंच आता एकनाथ खडसे यांना करोना संसर्ग झाला आहे. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आपण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेणार आहोत असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशच्या दिवशी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांना वैतागूनच आपण पक्ष सोडल्याचं खडसे यांनी सांगितलं होतं. तसंच यापुढे राष्ट्रवादीसाठी जोमाने काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे चर्चेत आलेल्या एकनाथ खडसे यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितलं आहे. तर एकनाथ खडसे हे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.