करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन आहे. महाराष्ट्रात तर जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाबंदीचा आदेश मोडून मुंबईहून बीडला पोहचले आहेत. खासगी वाहनाने त्यांनी प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांना, त्यांच्या चालकाला आणि कुटुंबीयांना होम क्वारंटाइन करा अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईतल्या कोळीवाडा भागात क्षीरसागर राहात होते. तिथून ते बीडमध्ये खासगी वाहनाने पोहचले आहेत. बीडमधल्या त्यांच्या बंगल्यात विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर कुटुंबीयांसह राहतात. अशात जयदत्त क्षीरसागर तिथे पोहचल्याने त्यांची, त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी आणि त्यांना होम क्वारंटाइन करण्यात यावं अशी मागणी केली जाते आहे. तसेच जिल्हाबंदीचा आदेश मोडल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशीही मागणी संदीप क्षीरसागर यांच्या समर्थक नगरसेवकांनी केली आहे.

 

संदीप क्षीरसागर यांच्या समर्थक नगरसेवकांनी या संदर्भातली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर संध्याकाळी उशिरा पोलीस क्षीरसागर यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. बीड जिल्ह्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच कडक भूमिका घेतली जाते आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर शुक्रवारीच जिल्हाबंदी तोडल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्या कुटुंबीयांसह मुंबईहून बीडला खासगी वाहनाने पोहचले.

नगर रस्त्यावरील बंगल्यात ते थांबले आहेत. याच बंगल्यात राष्ट्रवादीचे आमदार आणि जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर कुटुंबीयांसह राहतात. काका-पुतण्यांमधले वैर महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळेच काका येताच संदीप क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ही बाब तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन कळवली. मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढलेली असताना क्षीरसागर हे मुंबईतून बीडमध्ये आले आहेत. त्यामुळेच पोलीस त्यांच्या बंगल्यावर आले. आता क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाइन करावं अशी मागणी करण्यात आली आहे. आता पोलीस जयदत्त क्षीरसागर यांच्याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.