जिल्ह्य़ातील करोनाग्रस्तांच्या संख्येत गुरूवारी सायंकाळपर्यंत ३६ ची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ९०७ पर्यंत गेली आहे. एका राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदारांचा अहवालही सकारात्मक आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेले आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते यांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली

बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दौरा प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला. वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात टोपे जळगावी आले होते. त्याच दिवशी ८९ संशयितांचे अहवाल सकारात्मक आल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. करोनाग्रस्तांची वाढती संख्या थांबविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता प्रशासन काय उपाययोजना करणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. आतापर्यंत १०७ मृत्यू झाले असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या ३६९ आहे. सध्या ४१३ रुग्ण उपचार घेत आहेत.

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरणात असलेल्या सर्वांचे अहवाल नकारात्मक आल्याने संबधिताना घरी सोडण्यात आले. गुरुवारी चाळीसगांव शहरातील पहिला रुग्ण करोनामुक्त झाला. तसेच सायगाव येथील रु ग्णाच्या संपर्कातील बोरकुंड येथील रुग्णही करोनामुक्त होऊन घरी गेल्याची माहिती चाळीसगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.पी. बाविस्कर यांनी दिली आहे.