दिगंबर शिंदे

मातीच्या मैदानावर चटकदार कुस्ती करणारे बिजली मल्ल अशी ओळख निर्माण करणाऱ्या कृष्णाकाठच्या संभाजी पवार यांनी राजकीय आखाड्यातही लक्षवेधी लढती जिंकून महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. वसंतदादा पाटील यांच्या हयातीत त्यांच्याच घरच्या मैदानावर पुतण्याला पराभूत केले होते. रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते, पदपथ विक्रेते, शेतकरी यांच्यासाठी चोवीस तास मारुती चौकातील कार्यालय खुले ठेवणाऱ्या या बिजली मल्लाला कृष्णाकाठ मुकला.

माजी आमदार संभाजी पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यात राजकीय क्षेत्रात आपला वेगळाच दबदबा निर्माण करणारे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हयातीत त्यांचा पुतण्या विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव करून विधानसभेत  आगमन करणारे आप्पा म्हणजेच पै. संभाजी पवार यांना कुस्ती आखाड्यात जॉइंट किलर अशी उपाधी मिळाली होती.

सांगलीतील गावभागामध्ये हरि नाना पवार यांचा मुलगा म्हणून संभाजी पवार याची ओळख कृष्णाकाठाला होती. कुस्ती आखाड्यात गेले की प्रतिस्पध्र्याला काही कळायच्या आत धोबीपछाड करून कधी आस्मान दाखविले हे प्रेक्षकांना अगोदर कळायचे. एवढी चपळता अंगी असलेल्या संभाजी पवार यांनी प्रारंभीच्या काळात स्व. राजारामबापू पाटील यांच्याकडे राजकीय धडे गिरवले.

सांगली नगरपालिकेचा एक साधा नगरसेवक प्रस्थापित वसंतदादा  पाटील यांच्या राजकीय वारसा असलेल्या घराण्याविरुद्ध मैदानात उतरतो काय? आणि एकीकडे सत्ता, राजकीय वारसा, वसंतदादांच्या सारखा सक्रिय र्पांठबा असलेल्या काँग्रेस उमेदवाराचा पाडाव करून विधानसभेत जातो काय हे सगळे अचंबित करणारे होते.

१९८६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सहकार महर्षी अशी ओळख असलेल्या विष्णुअण्णा पाटील यांना पराभूत करून आमदारकी मिळवली होती. त्यानंतर सलग तीन वेळा आमदारकी त्यांच्याकडेच राखण्यात ते यशस्वी झाले होते.

राजकीय जीवनात प्रारंभ करीत असताना त्यांना शिवसेनेचा आधार वाटत होता. मात्र आमदारकीच्या वेळी जनता दलाकडून त्यांनी निवडणूक मैदानात उतरून मैदान गाजवले होते. सलग तीन वेळा त्यांनी जनता दलाचे तर एकवेळ भारतीय जनता पक्षाचे आमदार ते झाले होते. आमदारकीच्या काळात त्यांचा चळवळींर्चा ंपड मात्र कायम होता.

सामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत असा आग्रह धरत असताना कोणावर अन्याय होणार नाही याचीही ते दक्षता घेत असत. सांगलीच्या गावभागातील त्यांचे कार्यालय विनादरवाजाचे होते.

चार खुच्र्या आणि गप्पांची मैफल ही ठरलेली असायची. विधानसभेचे अधिवेशन संपले की, आप्पा कायम या कार्यालयात लोकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असत. सांगलीमध्ये पंधरा वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलन झाले. त्या वेळीही डिग्रजला पहिली धाव आप्पांनी घेतली होती. अगदी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना गावबंदी केली असताना आप्पांनी जाऊन तेथील स्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये मोलाची कामगिरी केली होती.

जनता दलामध्ये असताना त्यांनी शरद जोशींना सोबत घेऊन शेतकरी आंदोलनामध्येही सहभाग घेतला होता.  पुरोगामी विचारांशी बांधिलकी जपत असतानाही त्यांनी भाजपशीही जुळवून घेतले ते त्यांचे परममित्र गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमापोटी.

आप्पांचा गोपीनाथ मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध होता. यातूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जनता दलाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एक वेळ आमदारकी मिळवली होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा जसा विस्तार झाला तसे बदलत्या काळात आप्पा राजकीय विजनवासात गेले.