महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार विक्रमसिंहराजे घाटगे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. राजर्षी शाहू महाराज यांचे ते चुलत नातू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरली.
विक्रमसिंहराजे जयसिंगराव घाटगे यांचा राजघराण्यात जन्म झाला. ते राजर्षी शाहू यांचे चुलत नातू असल्याने थेट राजघराण्याशी सुरुवातीपासून संबंध राहिला. कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याची स्थापना त्यांनी १९८० साली केली. हा कारखाना यशस्वीरीत्या चालवून त्यांनी साखर कारखानदारीमध्ये ‘शाहू पॅटर्न’ आकाराला आणला होता. सन २००५ साली ते राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘शाहू मिल्क अॅण्ड अॅग्रो प्रोडय़ुस कंपनी’ची स्थापना करून त्यांनी दूध व्यवसायातही धवल यश मिळविले होते. कागल को-ऑप. बँक, जयसिंगराव घाटगे हायस्कूल, सिध्दनेर्ली विद्यालय यांचे नेतृत्वही त्यांच्याकडे होते. कुस्ती, क्रीडा, सांस्कृतिक, वाचन या क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातही विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाचा दबदबा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. १९७८ साली त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघात यश मिळविले ते अपक्ष आमदार या रूपाने. तर १९८५ साली ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. राज्यात युतीचे शासन असताना घाटगे यांनी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती.
घाटगे यांच्या अंत्यदर्शनासाठी येथील नागाळा पार्कातील निवासस्थानी विविध क्षेत्रांतील लोकांची गर्दी झाली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत शाहू महाराज, आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे आदींनी अंत्यदर्शन घेतले. कसबा बावडा परिसरातील राजघराण्यातील व्यक्तींसाठी असलेल्या राखीव जागेवर घाटगे यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साखर कारखानदारीतील ‘शाहू पॅटर्न’चे निर्माते
सहकारी साखर कारखानदारीमध्ये यशाचा वेगळा ‘शाहू पॅटर्न’आकाराला आणणारे विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या निधनाने साखर उद्योगाबरोबरच कागल तालुक्यालाही जबर धक्का बसला. साखर कारखानदारीमध्ये यशाची नवनवी क्षितिजे पार करणारे राजे हे कागल तालुक्यातील जनतेच्या हृदय सिंहासनावर विराज झाले होते. ढासळत्या साखर उद्योगाला मदतीचा हात देणारे नेतृत्व निघून गेल्याने साखर विश्वातून दुख व्यक्त केले जात असताना आपला राजा कायमचा अंतरल्याने कागलकर जनतेच्या डोळ्यातून अश्रू पाझरत राहिले.
विक्रमसिंह घाटगे हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. मराठी, इंग्रजी या दोन्ही भाषांच्या अफाट जोडीला त्यांनी शास्त्रीय संगीताची आवड जोपासली होती. कुस्तीच्या खेळाचाही त्यांना छंद होता. शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या घाटगे यांच्या कार्याचा खरा ठसा उमटला तो साखर उद्योगामध्ये. कागलच्या माळावर श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची स्थापना त्यांनी ३० वर्षांपूर्वी केली. या कालावधीत राष्ट्रीय राज्य पातळीवरील ५३ बक्षिसे त्यांनी पटकावली. एकही वर्ष असे नव्हते की या कारखान्याला पारितोषिक मिळालेले नव्हते. साखर कारखानदारी कशी सक्षम रीत्या चालवावी याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला होता. गेल्या सात वर्षांत ५० कोटींचा स्वनिधी आणि मार्च २०१२ अखेर ७० कोटींचे नक्त मूल्य (नेटवर्क) या कारखान्याने केले होते. इतर साखर कारखान्यांचा आíथक डोलारा कोसळत असताना सन २००३-०४ व २००५-०६ या वर्षांत शासकीय लेखापरीक्षणामध्ये अ+ असा दर्जा मिळविणारा एकमेव सहकारी साखर कारखाना हाच होता. राज्यातील साखर कारखानदारीला त्यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व हा मोलाचा आधार होता. अनेक बंद पडू लागलेल्या साखर कारखान्यांना त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने नवसंजीवनी प्राप्त झाली होती. विरोधकांकडूनही शाहू कारखान्याच्या आíथक कामगिरीचा नेहमीच गौरव केला गेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटना शाहू साखर कारखान्याला योग्य व रास्त देणे शक्य आहे मग इतर कारखाने का देत नाहीत, असा परखड सवाल करीत राहिल्या.
शाहू साखरेबरोबरच शाहू दुधाची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्यात घाटगे यांना यश आले. गोकुळ, वारणा यासारख्या बडय़ा दूध संघांचे कडवे आव्हान असतानाही शाहू दुधाच्या चवीने वेगळीच रंगत आणली. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला आधार देण्याचे काम त्यांच्या कागल सहकारी बँकेने केले. तर शेतकऱ्यांना माफत दरात खते व बियाणे पुरविणारी राजर्ष िशाहू कृषी सहकारी खरेदी विक्री संघ ही संस्था त्यांनी नावारूपाला आणली. शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्राशी जोडले गेले. सामान्य घरच्या विद्यार्थ्यांशी जमिनीवर बसून गप्पा मारण्यात या राजांना कधीच कमीपणा वाटला नाही. रुबाबदार व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे विक्रमसिंहराजे घाटगे कागलच्या जनतेचे लाडके राजे होते. राजे गेल्याची बातमी मंगळवारी सकाळी दिवस उजाडतानाच कळली आणि तालुक्यातील गावोगावच्या रयतेच्या अश्रूंचा बांध फुटला. संपूर्ण कागल तालुका आज बंद राहिला. शाळा, महाविद्यालयात श्रद्धांजली वाहून सुट्टी देण्यात आली. चौकाचौकात श्रद्धांजलीचे फलक लागले होते.

Hasan Mushriff on shahu maharaj
“महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा
Sanjay Mandlik on Shahu Maharaj Satej Patil
‘शाहू महाराज खरे वारसदार नाहीत’, महायुतीच्या संजय मंडलिक यांच्या विधानावर सतेज पाटील संतापले
With the blessings of Udayanaraj i got more strength says shivendrasinh raje
सातारा: महाराजांच्या आर्शिवादाने मला दहा हत्तीचे बळ- शिवेंद्रसिंहराजे
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार