23 April 2019

News Flash

..तर सरसंघचालक, मुख्यमंत्री गो-पालन का करत नाहीत?

डॉ. मुणगेकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देश घडवला. मात्र, देशाने त्यांच्यावर कायम अन्याय केला.

डॉ. मुणगेकर  यांचा सवाल

लोकांच्या जगण्याचे प्रश्न न सोडवता गोमांससारखे निरुपद्रवी विषय काढून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. गाय एवढीच प्रिय आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक  मोहन भागवत हे रेशीमबागेत गो-पालन का करीत नाहीत किंवा मुख्यमंत्री फडणवीस वर्षां बंगल्यावर गायी का पाळत नाहीत, असा सवाल माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी  केला. देशातील राज्य सरकारे बांधकाम व्यावसायिक चालवत असून पुढील १० वर्षांत नागपूर हे बकाल शहर होईल, असे भाकितही त्यांनी यावेळी केले.

स्टेट बँक ऑफ  इंडिया अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय कर्मचारी कल्याण संघटनेच्यावतीने किंग्सवे येथील बँकेच्या विभागीय कार्यालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत  होते. व्यासपीठावर बँकेचे उपमहाव्यवस्थापक एम.व्ही.आर. रविकुमार, एससी, एसटी, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अनिल गमरे, संघटनेचे अध्यक्ष अनंत कोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. मुणगेकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देश घडवला. मात्र, देशाने त्यांच्यावर कायम अन्याय केला. समाजाच्या प्रत्येक घटकाचे प्रश्न आणि त्यावरच्या उपाययोजना बाबासाहेबांनी सांगितल्या. आंबेडकरी अनुयायांनाही ते उमगले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत शेतकऱ्यांनी एवढय़ा आत्महत्या केल्या नाहीत तेवढय़ा अलीकडच्या वर्षांत झाल्या. तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १९१८ मध्ये बाबासाहेबांनी ‘स्मॉल होल्डिंग इंडस्ट्रिज’वर काम केले मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच शेतकरी आत्महत्या अथवा कामगारांना कामापासून वंचित ठेवले जात आहे. देशात टोकाची अस्वस्थता आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी गोमाता, योगा, ‘बीफ’ वर भर दिला जातोय. गाय एवढीच प्रिय आहे तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबागेत त्या पाळाव्यात आणि मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील गायी वर्षां बंगल्यावर घेऊन जाव्यात.

‘आधार’ सक्तीने अडवणूक

सरकारी योजनांमधील अफरातफरी थांबवण्यासाठी ‘आधार ’ योजना काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केली होती. मात्र, आता प्रत्येक गोष्टीसाठी आधार सक्ती केली जाते. ही निव्वळ अडवणूक आहे. बँक खाते, शाळा, कॉलेजेस सर्वत्रच आधारची सक्ती करून लोकांना नागवले जात आहे.

‘बीफ’चा व्यवसाय करणारे ८५ टक्के हिंदू

‘बीफ’ म्हणजे गोमांस नव्हे! आपल्याकडे ७५ टक्के बीफ म्हैस किंवा रेडय़ाचे असते. मटण आणि चिकन सोडून बाकी सर्व ‘बीफ’ आहे. उत्तर प्रदेशात ९५ टक्के कत्तलखाने मुस्लिमांचे तर ‘बीफ’चा व्यवसाय करणारे ८५ टक्के हिंदू होते. तेथील कत्तलखाने बंद करून लोकांना तेथील सरकारने भिकेला लावल्याचे  डॉ. मुणगेकर म्हणाले.

First Published on April 16, 2018 4:36 am

Web Title: former mp dr bhalchandra mungekar slam rss chief and cm over beef ban