News Flash

डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे

'त्याच्या मुंबई नाइट लाइफची मागणी त्याने देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार चालू झाले'

माजी खासदार नीलेश राणे

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. मुंबई नाइट लाइफची मागणी पूर्ण झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल, असे ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नीलेश राणे यांनी वारंवार शिवसेनेला लक्ष्य केले असून आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने शिवसैनिकांनी काही ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळले होते. या घडामोडी ताज्या असतानाच आता नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. त्यांनी ट्विटमध्ये थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेले नाही. सुप्रीम कोर्टाने डान्सबारसंदर्भात दिलेल्या निर्णयाचा दाखला त्यांनी दिला आहे. सुप्रीम कोर्टाने डान्सबार संदर्भातील जाचक अटीही शिथील केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटमध्ये नीलेश राणे म्हणतात, छोटा पेंग्विन खूश असेल, त्याच्या मुंबई नाइट लाइफची मागणी त्याने देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार चालू झाले.

नीलेश राणे यांनी आणखी एका ट्विटमध्ये बेस्ट संपावरुन शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेवरही टीका केली. स्क्रिप्ट लिहायचं काम संजय राऊत यांचे आहे. स्वतःकडून प्रश्न सुटत नाही आणि दुसऱ्याने सोडवले की सहन होत नाही. ह्या स्वभावाला चिंधीगिरी म्हणतात, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे. शशांक राव यांचे स्क्रिप्ट दुसऱ्याने लिहिले होते, असा आरोप अनिल परब यांनी केला होता. यावर नीलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

आदित्य ठाकरेंची मागणी काय होती ?
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाइट लाइफला परवानगी मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुंबई रात्रभर जागी असते. उद्योग आणि सेवाक्षेत्र झपाटय़ाने विकसित होत आहे. शहराचे राहणीमान बदलत चालले आहे. त्यामुळे कॅफे, दूध केंद्रे, औषधांची दुकाने, मॉल, रेस्तराँ रात्रभर सुरू ठेवावे, अशी त्यांनी मागणी केली होती. रात्रभर मुंबईसाठी अनिवासी भागाचा विचार व्हावा, असे त्यांचे म्हणणे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 9:22 am

Web Title: former mp nilesh rane controversial tweet on dancebar slams aditya thackeray
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 राज्याचे सिंचन बजट कमी नाही; गडकरींना गैरसमज झाला असेल
3 आरक्षण द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; नाभिक समाजाचा इशारा
Just Now!
X