पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत, यादरम्यान महाडिक यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. असे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात हा आणखी एक मोठा हादरा असणार आहे. दुसरीकडे महाडिक यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

जर काही कारणास्तव पंतप्रधान मोदींचा दौरा लांबणीवर पडला तर, महाडिक हे सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. या संभाव्य मोठ्या राजकीय घडामोडीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर येथील राजकीय वातावरण आगामी काळात ढवळून निघणार असल्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे राष्ट्रवादीला एका पाठोपाठ एक मोठमोठाले धक्के बसत आहे. राष्ट्रवादीतील मातब्बर नेत्यांचे सुरू झालेले आउटगोइंग काही केल्या थांबत नसल्याने, पक्ष अध्यक्ष शरद पवार यांची डोकेदुखी अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. एवढेच नाहीतर आगामी काळात राष्ट्रवादीतील आणखी काही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचाही भाजपाकडून दावा केला जात आहे.

गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने महाडिक हे नाराज होते. यामुळेच ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे.