तब्बल १८ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांना नागपुरात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. सध्या ते नागपुरात प्रकल्प अधिकारी आहेत.  
येथे हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी आतापर्यंत या प्रकरणी संस्थाचालक, प्राचार्य व सेतू कर्मचारी अशा १५ जणांना अटक केली आहे.  तपासादरम्यान घोटाळ्यात मेंडके यांचा सहभाग दिसून आला. गडचिरोली प्रकल्प कार्यालयात मेंडके २०११ ते २०१४ या तीन वर्षांच्या कालावधीत होते. याच कालावधीत राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती मोठय़ा प्रमाणात शिक्षणसंस्थांनी उचलली आहे. यासाठी मेंडके यांनी स्वत: पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे. कोटय़वधीची शिष्यवृत्ती संस्थांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तशा पद्धतीने धनादेश देण्यातही मेंडके यांनी मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.