महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ ट्रेकिंग करताना दरीत कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी (१ सप्टेंबर) शेखर हे दरीत कोसळल्याचे समजले होते, पण त्यांचा मृतदेह मात्र सापडला नव्हता. पाण्याचा वेगवान प्रवाह आणि अपूरा सूर्यप्रकाश असल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाने शोधमोहिम हाती घेतली असता त्यांचा मृतदेह दरीत सापडल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीने दिले. शेखर गवळी हे मूळचे नाशिकचे होते. महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस प्रशिक्षक म्हणून ते सध्या काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दिप्ती गवळी आणि दोन मुले असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी येथे काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. या भागात असलेल्या एका ठिकाणी ते गेले असता येथील एका कठड्याजवळ त्यांचा पाय घसरला आणि ते थेट २०० फूट दरीत कोसळले. शेखर गवळी यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. तसेच आपत्कालीन यंत्रणाही बचाव मोहिमेत सहभागी झाली. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. आज सकाळी तीन तासाच्या शोध मोहिमेनंतर प्रत्यक्ष घटनेच्या तब्बल १६ तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले.