राळेगणसिद्धीचे माजी सरपंच गणपतराव विठोबा औटी यांचे गुरुवारी निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे ते जवळचे सहकारी होते. ते ६५ वर्षांचे होते.
चार दिवसांपूर्वी एका मोटारसायकल अपघातात औटी जखमी झाले होते. तेव्हापासूनच ते अत्यवस्थ होत़े  गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. रुबाबदार दिसणारे गणपतराव ‘नाना’ या नावाने सर्वाना परिचित होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी होते. बबन घोलप यांच्या विरोधात बोलल्याने अण्णा हजारे यांना तुरुंगात टाकल्यानंतर राळेगणसिद्धी ते येरवडा अशी पायी दिंडी काढून त्यांनी युती सरकारला हादरा दिला होता. राळेगणसिद्धीचे सरपंच म्हणून त्यांनी पाच वर्षे काम उल्लेखनीय काम केले. औटी यांच्यावर सायंकाळी राणेगणसिद्धीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार विजय औटी, नंदकुमार झावरे, सुजित झावरे, काशीनाथ दाते, उदय शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.