मराठवाड्याच्या विकासाची हाक देत माजी शिवसैनिकांनी नवा पक्ष स्थापन करणार आहेत. ‘मराठवाडा विकास सेना’ असे या पक्षाचे नाव असून मराठवाड्यातील प्रश्नांवर हा पक्ष काम करणार आहे. अशी माहिती संस्थापक सुभाष पाटील यांनी दिली. २३ जानेवारीला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पक्षाची घोषणा केली जाणार आहे. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्राम गृह या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कारभारावर यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. स्वतःचा आर्थिक कार्यभार मोठा करण्यासाठी खासदारांना समांतर योजना हवी आहे. मात्र ती योजना आम्ही हाणून पाडू असा इशाराही सुभाष पाटील यांनी दिला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची राहिली नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच आम्ही नवा पक्ष स्थापन करणार आहोत. मराठवाड्याच्या विकासासाठी आमचा पक्ष काम करेल असेही पाटील यांनी म्हटले आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अपुऱ्या निधीमुळे मराठवाड्याचा विकास खुंटला असून तो अनुशेष भरून निघायला हवा. समतोल विकासासाठी कोणतीही ठोस उपाय योजना झाली नाही. महाराष्ट्राचे तुकडे होऊ नयेत अशी समंजस भूमिका घेऊन विकासाची मागणी करणार असल्याचं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी पुरेशी नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी सरसकट कर्जमाफी करावी. कापूस उत्पादक शेतकरी बोंड अळीमुळे हताश झाला आहे. त्याची योग्य दखल घेऊन मदत करावी.

शेतीमालाला हमीभाव, मोफत वीज, शेतकऱ्यांच्या मुलांना वसतिगृह उपलब्ध करावा. मराठवाड्याचा रणजी दर्जाचा स्वतंत्र संघ स्थापन करा. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटला असून महानगरपालिका बरखास्त करा. अशी मागणी करण्यात आली. मराठवाड्यातील पर्यटनाला चालना द्यावी, रस्ते खडे मुक्त करावे. असे विविध मुद्दे यावेळी मांडण्यात आले.