News Flash

कृष्णा-कोयनेचा पाणीउपसा आणि पाणीउपसा बंदीचा कालावधी जाहीर

दरम्यान, उपसा बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जलसंपदा खात्याने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे.

संभाव्य पाणीटंचाई आणि लगतच्या विभागातील दुष्काळाची दाहकता गांभीर्याने घेऊन जलसंपदा विभागाने दक्षता म्हणून कृष्णा-कोयना या प्रमुख नदय़ांच्या काठावरील पाणीउपसा बंदीचा कार्यक्रम जारी केला आहे. त्याची अंमलबजावणी २४ मे ते १ जून या कालावधीत होणार आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील नदीमधून औद्योगिक व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजनांना हा बंदी आदेश लागू असून, यातून पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना वगळण्यात आले आहे.

उपसाबंदीचा कार्यक्रम असा – उपसा कालावधी – १२ ते २३ एप्रिल, २९ ते १० मे, १६ मे ते २७ मे, तसेच उपसाबंदी कालावधी २४ ते २८ एप्रिल, ११ मे ते १५ मे, २८ मे ते १ जून. जूनच्या पहिल्या आठवडय़ातील परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान, उपसा बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जलसंपदा खात्याने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रथमच अशा प्रकारचा आदेश लागू करण्यात आला असून, कृष्णा व कोयना नदीतून पाणीउपसा केल्यास हा पाणीउपसा बेकायदा ठरवून हे कृत्य करणाऱ्या मिळकतदार अथवा खातेदाराचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षांसाठी रद्दबातल ठरवण्यात येणार असून, उपसासंच सामग्री जप्तीची कारवाईही होणार आहे.

सांगली पाटबंधारे मंडळ व टेंभू उपसा सिंचन प्रकल्प यांनी संयुक्तपणे थोडे सहकार्य, थोडे नियोजन, पाणी फुलवे आपले जीवन ‘उपसाबंदी आदेश’ या शीर्षकाखाली कृष्णा-कोयनेच्या पाणी उपशावरील र्निबधासंदर्भात जाहिरात प्रसिद्धीस दिली आहे. त्यात म्हटले आहे, की सातारा व सांगली जिल्ह्यातील कोयना धरण पायथ्यापासून ते कृष्णा-कोयना प्रीतिसंगम कराडपर्यंत कोयना नदीवरील डाव्या व उजव्या तीरावरील सर्व शेती क्षेत्र तसेच कृष्णा नदी तीरावरील कृष्णा-कोयना प्रीतिसंगम कराड ते बहे बंधारा, उजवा तीर तसेच कृष्णा कोयना प्रीतिसंगम ते डिग्रज बंधारा (जि. सांगली), डावा तीर, खोडशी बंधारा फुगवटा-कोणेगाव बंधारा ते कृष्णा कोयना प्रीतिसंगम कराड या भागातील लाभधारक शेतकऱ्यांना या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. २०१५-१६ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणामधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे कोयना धरणातून सिंचन व बिगरसिंचन तसेच विद्युत निर्मितीसाठी लागणाऱ्या पाणी वापरात कपात करणे अपरिहार्य आहे. या वर्षी या लाभक्षेत्रातील फक्त उभ्या पिकांना पाणी उपलब्ध होईल. नवीन कोणतीही बारमाही पिके न घेण्याबाबत ऑक्टोबर २०१५ च्या शेवटच्या पंधरवडय़ामध्ये सांगली पाटबंधारे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

सन २०१५-१६ मध्ये कोयना-वारणा, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी जलाशयातून कृष्णा-कोयना नद्यावरील सिंचन व बिगर सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन आणि कृष्णा नदीवरील धरणामधील उपलब्ध पाणीसाठा, तापमानातील वाढ विचारात घेऊन आणि पावसाळय़ापर्यंत पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी जलसंपदा विभागाच्या सांगली पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. १ जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ातील परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे. कोयना व कृष्णा नदीवरील लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपाण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करून फक्त उभ्या पिकांना पाणी देण्यात येणार आहे. नवीन कोणतीही बारमाही पिके घेऊ नयेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:43 am

Web Title: found solution on water security in karad
टॅग : Krishna River
Next Stories
1 विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील – रामदास आठवले
2 सराफ व्यावसायिकांचा आजपासून तीन दिवस संप
3 टंचाई योजनांना निधीची प्रतीक्षा!
Just Now!
X