मस्करीचा प्रकार जीवावर बेततो तसाच प्रकार कोल्हापुरात घडला आहे. सांगलीतील एका फॉन्ड्रीत काम करणाऱ्या आदित्य जाधव या कर्मचाऱ्याच्या गुदद्वारात सुपरवायझरने प्रेशरने हवा सोडली. ज्यामुळे आदित्य जागीच बेशुद्ध पडला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. हातकणंगले येथील अतिग्रे या ठिकाणी ३ सप्टेंबरला ही घटना घडली होती. बुधवारी म्हणजे काल आदित्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आदित्य जाधव हा दहावीपर्यंत शिकला होता. त्याचे आई वडिल शेती करायचे. घरची परिस्थिती गरीब असल्याने तो अतिग्रे येथील एका फॉन्ड्रीमध्ये कामासाठी जायचा. मध्यरात्री तीनच्या सुमारास काम सुरु असताना आदित्य सुपरवायझरजवळ आला. त्यावेळी त्या सुपरवायझरने आदित्यच्या केसांवर, कपड्यांवर हवा मारण्यास सुरूवात केली. त्याची मस्करी करता करता अचानक या सुपरवायझरने आदित्यच्या गुदद्वारात हवा सोडली. या प्रकारामुळे आदित्यला धक्का बसला आणि तो खाली कोसळला. सुपरवायझरने कोणताही गाजावाजा न करता काही घडलेच नाही या अविर्भावात त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य निपचित पडला होता. त्यानंतर आदित्यला रूग्णालयात हलवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला.

आदित्य जाधव मध्यरात्री बेशुद्ध झाल्याने कामगारांनी त्याला इचलकरंजी येथील रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कोल्हापूरला हलवण्यास सांगितले. त्यानुसार नागाळा पार्क या ठिकाणी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेपासून संशयित सुपरवायझर फरार आहे. शाहुपुरी पोलिसांनी संशयित सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला आहे तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.