अलिबाग : महाड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यलयाच्या प्राचार्यपदावरून गुरुवारी जोरदार हाणामारी झाली. यात सहा जण गंभीररीत्या जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या प्रकरणी डॉ. धनाजी गुरव यांच्यासह ३० जणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना ३० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

गेल्या पाच वर्षांपासून महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा वाद सुरू होता. गुरुवारी हा वाद विकोपाला गेला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डॉ. धनाजी गुरव हे आपल्या समर्थकांसह महाविद्यलयाच्या आवारात लोखंडी रॉड, दगडविटा, लाठय़ाकाठय़ांसह घुसले आणि त्यांनी जोरजबरदस्तीने प्राचार्य दालनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या वेळेस महाविद्यालयाच्या आवारात तोडफोड तर करण्यात आलीच, पण प्राचार्य सुरेश आठवले आणि त्यांच्या समर्थकांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये आठवले यांच्यासह महेंद्र घारे, विठ्ठल गायकवाड, अरविंद साळवी, संजय हाटे आणि स्वत: डॉ. धनाजी गुरव हे जखमी झाले आहेत. यापैकी महेंद्र घारे, विठ्ठल गायकवाड आणि सुरेश आठवले हे गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी आठवले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रा. डॉ. धनाजी गुरव आणि अनिल जाधव, कल्पेश जाधव, डॅनियल सोनावणे, रोहिदास चव्हाण, बाबुराव शेळके, रमेश पाटील, गणेश महाडीक, सचिन पार्टे, राकेश सोनार, अशोक तळवटकर आणि चिन्मय गुरव आणि इतर अज्ञात पंचवीस ते तीस जणांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२६, ३२५, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, १०९, २०१, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), (३) १३५, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट ३ (१),(आर), ३ (२),(५) आणि १ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी डॉ. धनाजी गुरव, अनिल जाधव, कल्पेश जाधव, डॅनियल सोनावणे यांना पोलिसांनी अटक केली, त्यांना आज महाड येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांनाही ३० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, महाविद्यालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून अनेक वेळा हाणामारीच्या घटना घडूनही पीपल्स एज्युकेशन सोसायटीने त्याची गंभीर दखल घेतलेली नाही. याबद्दल महाडकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्राचार्यपदाच्या वादाची पार्श्वभूमी..

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्यपदाचा वाद सन २०१४ पासून सुरू आहे. संस्थेच्या एका संचालक मंडळाने सन २०१४ मध्ये प्रा. डॉ. धनाजी गुरव यांना निलंबित केले आहे. त्यांच्या जागी प्रभारी प्रचार्य म्हणून सुरेश आठवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या संचालक मंडळाने डॉ. धनाजी गुरव हेच प्राचार्य असून सुरेश आठवले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

गेली पाच वर्षे हा वाद सुरू आहे. या वादात तीन वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्यावरही प्रणघातक हल्ला करण्याचा प्रकार घडला होता.