लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झपाट्याने वाढतच आहे. करोनामुळे चार जणांचा मृत्यू व ४८ नव्या रुग्णांची नोंद शनिवारी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ८८ जणांचे बळी गेले आहेत. एकूण रुग्ण संख्या १६६५ वर पोहचली. जिल्ह्यात रुग्णवाढीसोबतच मृत्यूदर वेगाने वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकोला जिल्ह्यात करोना संसर्गाचा प्रसार शहरीसह ग्रामीण भागात होत आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढले. त्यामुळे जिल्हा हादरला आहे. विविध उपाययोजना करूनही बाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अद्याापही प्रशासनाला यश आले नाही. रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यातील एकूण ३५४ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ३०६ अहवाल नकारात्मक, तर ४८ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत एकूण १२०६९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ११६७३, फेरतपासणीचे १५० तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २४६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ११९९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात नकारात्मक अहवालांची संख्या १०३२७, सकारात्मक अहवाल १६६५ आहेत. दरम्यान, आज चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन पुरुष असून एक महिला आहे. बाळापूर येथील ३६ वर्षीय रुग्णाला २३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा काल रात्री मृत्यू झाला. अकोट येथील ७२ वर्षीय रुग्ण २ रोजी दाखल झाला होता. खैर मोहम्मद प्लॉट येथील ७२ वर्षीय रुग्णाला २९ जून रोजी दाखल करण्यात आले होते. हे दोन्ही रुग्ण आज पहाटे दगावले. बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथील २४ वर्षीय महिला रुग्णाचा सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ३० जून रोजी दाखल करण्यात आले होते.

आज दिवसभरात ४८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात ४७ रुग्ण आढळून आले. त्यात १५ महिला व ३२ पुरुष आहेत. त्यातील पातूर येथील १४ जण, बाळापूर येथील १२ जण, खोलेश्वार, अकोट येथील प्रत्येकी चार जण, लहान उमरी, डाबकी रोड व जीएमसी वसतिगृह येथील प्रत्येकी दोन जण, तर बार्शिटाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला. तो पुरुष रुग्ण अकोटमधील सरस्वतीनगर येथील रहिवासी आहे.

७५.३७ टक्के रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२५५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्याचे प्रमाण ७५.३७ टक्के आहे. आज २९ जण कोविड केअर केंद्रामधून, तर चार जणांना शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून असे एकूण ३३ जणांना घरी सोडण्यात आले.
अकोल्यातील मृत्यूदर ५.२२ टक्के
जिल्ह्यामध्ये गत काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मृत्यूदर ५.२२ टक्के झाला असून, राज्याच्या तुलनेत तो अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.