हर्सूल तलावात पोहण्यास गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले. चौथ्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. सकाळी पोहायला शिकण्यास गेलेल्या सहा मित्रांपैकी चौघांचा बुडून मृत्यू झाला. यातील दोघे दहावीत शिकणारे होते.
दहावीच्या परीक्षा संपल्याने जुना बाजार येथे राहणाऱ्या सहा जणांनी पोहायला जाण्याचा बेत आखला होता. यातील सय्यद जनेनोद्दीन फैजोद्दीन कादरी, सय्यद जबी सय्यद युसूफोद्दीन कादरी, शेख मुश्तकीन शेख अलीम, शेख ओसामा मोहम्मद जमीनोद्दीन या चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सापडले. शेख मुश्तकीन शेख अलीम याचा शोध सुरू आहे. सकाळी सहा-साडेसहाच्या आसपास ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
हर्सूल तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवता यावे, म्हणून एक सुरक्षारक्षक नेमला आहे. त्याला सकाळी दहाच्या सुमारास तलावात चप्पल तरंगताना दिसली. तलावाभोवती काही जणांचे कपडे व दुचाकी दिसल्याने त्याने पोलिसांना कळविले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तलावात शोध घेतला असता तिघांचे मृतदेह आढळून आले. बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोहण्यासाठी गेलेल्या अन्य जणांचा शोध पोलीस घेत आहेत.