आजारी महिलेस रुग्णवाहिकेतून मुंबईला उपचारासाठी नेत असताना एकाच कुटुंबातील तिघे व चालक अशा चारजणांचा सोमवारी सकाळी लोणावळ्याजवळ अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका पुलाला धडकली. या अपघातात अन्य दोनजण जखमी झाले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास लोणावळा (जिल्हा पुणे) येथे हा अपघात झाला.
हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर (तालुका कळमनुरी) येथील उषाबाई भागोराव बोरकर (वय ५०) अर्धागवायूमुळे आजारी असल्याने नांदेडच्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांना पुढील उपचारासाठी त्यांची मुले प्रवीण (वय ३०), त्यांची पत्नी वर्षां, तसेच दुसरा मुलगा प्रशांत व जावई नरसिंगराव सदाशिव पतंगे (वय ४०, कोंढूर) हे रुग्णवाहिकेतून (एमएच २६ एन ३१३१) मुंबईला निघाले होते. मात्र, लोणावळ्याजवळ ही रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठडय़ावर आदळली. या अपघातात आजारी उषाबाई बोरकर, त्यांचा मुलगा प्रशांत, जावई नरसिंगराव पतंगे हे तिघे, तर गाडीचा चालक अब्दुल अजीज अब्दुल करीम (नांदेड) ठार झाले. चालक करीमचा उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले असता मृत्यू झाला. वर्षां प्रवीण बोरकर व प्रशांत बोरकर हे दोघे जखमी झाले. प्रशांत यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
सोमवारी ऐन पोळ्याच्या दिवशी नांदापूर गावावर या अपघातामुळे शोककळा पसरली. ग्रामस्थांनी गावात बलपोळ्याचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला. अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह संध्याकाळपर्यंत नांदापूरला आणण्यात येणार होते. रात्री अंत्यसंस्कार होणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.