कोपरगाव :  नाशिकहून कोळपेवाडीवरून कोपरगावकडे जात असताना मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने ती  झाडावर आदळून  झालेल्या अपघातात नाशिकच्या वानले कुटुंबातील चार जण ठार झाले. यात पत्नी व दोन मुले जागीच ठार झाली, तर  पतीला उपचारासाठी कोकण ठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये हलवले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. वानले कुटुंब  मूळचे मोहाडीचे असून सध्या ते नाशिकमध्ये राहात होते. मंगळवारी ते नाशिक येथून कोळपेवाडी मार्गाने कोपरगावकडे येत होते.

रवींद्र वानले, प्रतिभा रवींद्र वानले,  साई रवींद्र वानले ,जानव्ही रवींद्र वानले हे चौघे जण होंडा सिटी (झेड एक्स एम एच १५ बी एक्स ५१४५ )मोटारीतून मंगळवारी  रात्री कोळपेवाडी मार्गाने कोपरगाव कडे येत असताना वहाडणे वस्तीजवळ  रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. काही वेळाने मोटारीने पेट घेतला. सुदैवाने तोपर्यंत आसपासच्या वस्तीवरील लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेऊ न गाडीतील सर्वांना बाहेर काढले होते.  नागरिकांनी तातडीने आग विझविली. मात्र या घटनेत  तिघे जागीच  ठार झाले. रवींद्र वानले यांना जबर दुखापत झाली होती, त्यामुळे नागरिकांनी त्यांना तातडीने कोकण ठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले होते,  बुधवारी दुपारी  त्यांचाही मृत्यू झाला.