एकाची प्रकृती चिंताजनक; परभणीला हलवले

तालुक्यातील मानोली येथील गैरप्रकरणांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याने चार शेतक ऱ्यांनी मानवत तहसील कार्यालयात जाऊन विष प्राशन केले. ही घटना गुरुवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. शेतकऱ्यांना मानवत येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीस रवाना करण्यात आले आहे.

मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदाराना निवेदन दिले होते. निवेदनात गावातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, गावातील २२ बोगस बंधाऱ्यांची चौकशी करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या समस्या न सोडविल्यास १९ एप्रिल रोजी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत  लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम, शेख शगिर यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चंद्रकांत तळेकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आल्याचे समजते.