मांडावी येथील बोट दुर्घटना ताजी असताना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विरार-अर्नाळा येथे एक मासेमारी बोटीला अपघात झाला होता. मात्र सुदैवाने यातील चार मच्छिमारांना सुखरूप वाचवण्यात यश असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अर्नाळा येथे समुद्रात मासेमारी करून परतणाऱ्या एका बोटीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने बोट समुद्रात भरकटली. यावेळी या बोटीत चार मच्छिमार होते. यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. अचानक बोटीचे इंजिन बंद पडल्याने सागरी लाटांच्या तडाख्यात बोट भरकटू लागली. सुदैवाने बोट किनाऱ्यापासून जास्त अंतरावर नव्हती. दरम्यान यावेळी अर्नाळा पोलिसांची बोट सागरी गस्त घालत होती. गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना बोटीतील लोकांचा आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ बोटीच्या दिशेने धाव घेतली आणि चारही मच्छिमारांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.

या नंतर बिघाड झालेली बोट देखील दोरीच्या सहाय्याने किनाऱ्यावर आणण्यात आली. राजेश गजानन वैती, परेश गजानन वैती, निशा राजेश वैती व वंदना वैती अशी या मच्छिमारांची नावं असून हे सर्व अर्नाळा किल्ला गावातील रहिवसी व एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. पोलिसांनी स्पीड बोटच्या सहाय्याने हे बचाव कार्य केल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास मेहेर यांनी सांगितले.