चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून गोण्यांखाली दबले गेल्याने चार जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे साक्रीजवळील इच्छापूर येथे घडली. सर्व मृत व जखमी जळगाव जिल्ह्यातील आहेत.
गुजरातमधून गोण्या भरलेला ट्रक साक्रीकडे येत असताना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास इच्छापूर या गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक उलटला. या ट्रकमधील गोण्यांवर जळगाव जिल्ह्यातील काही कामगार बसलेले होते. ट्रक उलटताच हे कामगार फेकले गेले. त्यांच्यावर गोण्या पडल्याने ते दाबले गेले. पहाटेच्या वेळी या रस्त्यावर फारशी वाहतूक नसल्याने त्वरित मदत मिळू न शकल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात आनंदा बाबुराव चव्हाण (५२, रावसेबुद्रुक ता. चोपडा), राकेश ज्ञानेश्वर पाटील (१२, रा. नीम ता. अमळनेर), राजेंद्र बाबुलाल पाटील (४५, मोंडाळेपिंप्री, ता. पारोळा), गोरख राजाराम पाटील (४२, हनुमंतपाडा, ता. पारोळा) यांचा समावेश आहे. हे सर्व सध्या गुजरातमधील चलस्थान परिसरात वास्तव्यास होते. चालक गब्बरभाई अबुलभाई खलिफा (५०, भावनगर, गुजरात), पूजाबाई आनंदा चव्हाण (रा. रावसेबुद्रुक, ता. चोपडा), सुषमा ज्ञानेश्वर पाटील, चेतन ज्ञानेश्वर पाटील (नीम. ता. अंमळनेर) हे जखमी झाले. अपघात प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.