पुणे महामार्गावर पाकणी गावाजवळ भरधाव बोलेरोने टँकरला धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जीव गमावणारे चौघे जण एकाच कुटुंबातील असून हे सर्व जण अक्कलकोटचे रहिवासी होते. पुण्यात मुलीला भेटण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी जाताना हा अपघात घडला आहे.
अक्कलकोटमधील समर्थ टौकात राहणारे आलोणे कुटुंब शुक्रवारी बोलेरो जीपने पुण्याला निघाले होते.पाकणी गावाजवळ थांबलेल्या टँकरला भरधाव बोलेरोने पाठीमागून धडक दिली. या धडकेत नारायण रामचंद्र आलोणे (७२) , गोकुळ रामचंद्र आलोणे (६०) व प्रियांका ओंकार आलोणे (२२) यांचा मृत्यू झाला. सुलोचना आलोणे (६०) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओकांर आलोणे (२५) हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ओंकार आणि प्रियंकाचे नुकतेच लग्न झाले होते.


अक्कलकोटमधील समर्थ चौकात राहणा-या आलोणे कुटुंबाचा भांड्यांचा व्यवसाय आहे. पुण्यात आपल्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी तसेच स्वतःच्या आजारपणावरील वैद्यकीय उपचारासाठी निघाले होते. बांधकाम अभियंता असलेले पुतणे ओंकार आलोणे हे गाडी चालवत होते. सोलापूरजवळ नाष्टा व चहा घेऊन गाडी पुढे निघाली असताना हा दुर्दैवी अपघात घडला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. आलोणे कुटुंबावर झालेल्या या आघातामुळे अक्कलकोटमधील समर्थ चौक परिसरात शोककळा पसरली आहे.