22 October 2020

News Flash

अंदाधुंद गोळीबाराने भुसावळ हादरले; भाजपाच्या नगरसेवकासह पाच ठार

पूर्व वैमनस्यातून हल्ला

(संग्रहित छायाचित्र)

पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्याने रविवारी रात्री भुसावळ शहर हादरले. भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात (५०) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५) मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०), सुमित गजरे हे पाच जण ठार झाले आहेत. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात हे भुसावळमधील समता नगर येथे राहतात. रविवारी रात्री पावणे दहा वाजता चार हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात आणि सुमित गजरे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या हल्ल्यात रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एकजण असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने भुसावळ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यात हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. हल्ला करणारे आरोपीही या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, आरोपींनी हल्ला केल्यानंतर खरात यांच्या कुटुंबियानीही गोळीबार केला. त्यामुळेच हे तिघे जखमी झाले. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर सलग दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. यापूर्वीही खरात यांच्या घरावर जमावाने दगडफेक करत गोळीबार केला होता. गावठी पिस्तूलातून हवेतून तीन फैरी झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी या हल्ल्यातून खरात थोडक्यात बचावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 7:21 am

Web Title: four killed in firing attack in bhusawal bmh 90
Next Stories
1 नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ
2 कोथरूडप्रमाणे नाशिकमध्ये संयुक्त उमेदवार?
3 बंद ‘स्मार्ट’ रस्त्याचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास
Just Now!
X