रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला एस.टी. बसने ठोकरून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार, तर १८ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी पहाटे मिरज-पंढरपूर महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्तांमध्ये बहुतांश प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील आहेत.
सांगली आगाराची बस (एमएच १४ बीटी ३६१३) ही शेगाव (जि. बुलढाणा) येथून सांगलीकडे येत होती. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची या गावानजीक रस्त्याकडेला टायर फुटल्याने उभे असलेल्या ट्रकवर (एमएच ०९ एल ९५१९) आदळली. या अपघातात बसचा वाहक सुमित शेंटमाळके (वय ३०, रा. जरंग, जि. यवतमाळ) याच्यासह संजय माणिक वसराम (४०), त्याची मुलगी कु. दक्षता (१४) आणि जया प्रताप पराडकर (४२, रा. शाहूपूरी, कोल्हापूर) हे चार जण जागीच ठार झाले.
वाळू वाहतूक करणारा ट्रक टायर फुटल्याने रस्त्याकडेला उभा होता. पंढरपूरकडून आलेली बस थेट ट्रकला ठोकरल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात बसची डावी बाजू फाटत गेली. त्यामुळे या बाजूला बसमध्ये बसलेले प्रवासी अपघातग्रस्त झाले. या अपघातात तीन मुलींसह सहा महिला जखमी झाल्या असून ९ प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातात जखमी महिलांची नावे सविता मसराम (३२, पहूर कळंब), सुशीला भारसाखळे (४७, गोपाळ खेड, अकोला), माधुरी काकडे (४०, बुलढाणा), चिमाबाई पाटणे (५५, हिवरखेड, ता. खामगाव, जि. बुलढाणा), प्रियांका ठाकूर (२२, मिरज), संगीता तराळे (३२, अकोला). मुलींची नावे  गार्गी जसराम (२, यवतमाळ), मधुरा पराडकर (५, कोल्हापूर), साक्षी तराळे (१२, अकोला). या अपघातातील जखमी अन्य प्रवाशांची नावे अशी  शिवराम तराळे (४० अकोला), मधुकर इंगोले (अकोला), प्रकाश काकडे (४७, बुलढाणा), रिवद्र पाटणे (५०, यवतमाळ), महेश पुजारी (३२, सोलापूर), महादेव पाटणे (६४, हिवरखेड), प्रथमेश खेते (२१, खामगाव), अभिमन्यु ठाकूर (२४, मिरज) आणि अशोक केने (राधानगरी).
दुर्घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेनंतर बसमधील प्रवाशांनी एकच आक्रोश केल्याने रस्त्याकडेला असलेल्या वस्तीवरील लोकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. सदर दुर्घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाणे व हेल्पलाईनला देण्यात आली. हेल्पलाईनच्या चमूने अवघ्या २७ मिनिटात घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. किरकोळ जखमींना कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात, तर गंभीर जखमींना मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपअधीक्षक श्रीमती पौर्णिमा चौगुले यांच्यासह कवठेमहांकाळचे निरीक्षक रिवद्र डोंगरे व त्यांचे कर्मचारी यांनी तत्काळ हजर राहून बचाव कार्यात मदत केली.