रायगड जिल्ह्य़ातील लेडीज सव्‍‌र्हिस बार उत्पादन शुल्क विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्य़ातील चार लेडीज सव्‍‌र्हिस बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाच्या शिफारशी जारी करण्यात आले आहेत. मात्र लेडीज सव्‍‌र्हिस बारमधे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लॉजिंगचे परवाने रद्द कधी होणार, असा सवाल विचारला जातो आहे.
   रायगड जिल्ह्य़ातील लेडीज सव्‍‌र्हिस बारच्या अनैतिक धंद्यावर प्रकाशझोत टाकणारे वृत्त ‘लोकसत्ता’च्या ७ मे २०१३ च्या अंकात छापून आले होते. या वृत्ताची नंतर गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. खारघर, पनवेल आणि खालापूरमधील लेडीज सव्‍‌र्हिस बारवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्य़ातील चार लेडीज सव्‍‌र्हिस बारचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर याच भागातील सात बारला नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगडच्या उत्पादन शुल्क अधीक्षक संगीता दरेकर यांनी दिली आहे.
   पनवेलमधील कपल बार तर खालापूरमधील स्वागत, पूनम आणि साईलीला बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे. तर नेवाडे फाटा येथील चंद्रविलास, नवीन पनवेल येथील सप्तगिरी, कोणफाटा येथील साईराज आणि नटराज, पनवेल येथील सनशाइन, पळस्पे फाटा येथील मूननाइट, कळंबोली येथील महेश बारला उत्पादन शुल्क विभागाने नोटीस जारी केल्या आहे. मात्र अद्यापही टाइम्स, नाइट रायडर, गोल्डन नाइट ग्रिट्ससारख्या आणखी काही बारवर कारवाई होण बाकी आहे. या लेडीज बारवर कधी होणार, असा सवाल विचारला जातो.
    दरम्यान, नुसते बारचे परवाने रद्द करून इथल्या अनैतिक व्यवहारांना आळा बसणार नाही. कारण लेडीज बार हे केवळ अनैतिक धंद्याचे माध्यम आहे. या अनैतिक धंद्यांना पूर्णत्वास नेण्याचे काम बारशेजारी असणाऱ्या लॉजिंग रूम्स माध्यमातून केले जाते आहे. कपल बारवर करण्यात आलेल्या कारवाईतही बारशेजारी असणाऱ्या डिम्पल लॉजमध्येच वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बारबरोबरच अनैतिक धंद्याना प्रोत्साहन देणाऱ्या लॉजचे परवाने रद्द होणे गरजेचे आहे.
तर लेडीज बारचे परवाने पुन्हा या बारचालकांना मिळू नये यासाठी रेस्टॉरंट परवानेही रद्द होणे गरजेचे आहे. रायगडचे लेडीज सव्‍‌र्हिस बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश काढणारे जिल्हाधिकारी रेस्टॉरंट आणि लॉजिंग परवाने रद्द करणार का, हे पाहणे गरजेचे आहे.