दरवर्षी घोषणा करूनही शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुस्तके देण्यात पूर्णपणे यश येत नाही. या वर्षी मात्र शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्याच दिवशी गावातील प्रतिष्ठित व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मुलांना मोफत पाठय़पुस्तके देऊन पुस्तक दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या साठी सरकारकडून मे महिन्यातच शिक्षण विभागाला पुस्तके प्राप्त झाली असून, एकही विद्यार्थी वंचित राहू नये, या साठी मुख्याध्यापकांनी दक्ष राहावे, अशा सूचना देत जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ८९४ विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके देण्याची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनी दिली.
जि. प. शिक्षण विभाग नेहमीच अनागोंदी कारभाराने चच्रेत असतो. दरवर्षी सरकारच्या सूचनांनुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठय़पुस्तके मिळावीत, या साठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केले जातात. मात्र, पहिल्या दिवशी मुलांना पुस्तके देण्यात शिक्षण विभागाला पूर्णत: यश येत नाही आणि घोषणा करूनही पुस्तके मिळाली नाहीत, याचीच चर्चा होऊन शिक्षण विभागाला बदनामीला सामोरे जावे लागते. या पाश्र्वभूमीवर या वर्षी सरकारच्या सूचनेप्रमाणे १५ जूनला शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत मुलांना मोफत पाठय़पुस्तके देण्यात येणार आहेत. या साठी जिल्हास्तरावर पुस्तके प्राप्त झाली असून, तालुका ते शाळास्तरापर्यंत पुस्तक वाहतूक करण्याची तयारी केली जात आहे. कोणत्याही स्थितीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप करण्याचा चंग बांधला आहे. अकरा तालुक्यातील जि. प. व खासगी अनुदान शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतचे ३ लाख ९४ हजार ८९४ विद्यार्थी मोफत पाठय़पुस्तकांसाठी पात्र असल्याने या मुलांना पुस्तके देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्या दिवशी शाळेत मुलांचे स्वागत व त्यांना मोफत पाठय़पुस्तके देऊन पुस्तक दिन साजरा करण्यात येणार आहे.