परभणी जिल्ह्यापासून नांदेड, िहगोली व जिंतूर या मुख्य शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण होणार आहे. सरकारकडून या बाबत सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.
वाढती वाहने, अरुंद रस्ते, त्यामुळे वाढणारे अपघात लक्षात घेता सरकारने परभणी ते जिंतूर, परभणी ते नांदेड तसेच परभणी ते िहगोली या रस्त्यांच्या चौपदरीकरणाबाबत विधान परिषदेत गेल्या १८ डिसेंबरला उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर दिले. वाहतूक वर्दळीवर आधारित तांत्रिक व आर्थिक सुसाध्यतेनुसार या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून परभणी ते नांदेड, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परभणी ते जिंतूर या रस्त्यांचा चौपदरीकरणाचा अहवाल तयार करण्याबाबतचे आदेश होते. परभणी ते िहगोली दरम्यान हट्टा ते औंढा रस्ता वगळून उर्वरित सर्व रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येईल, अशी माहिती सरकारने दिल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्याबाबतचा अहवाल पूर्ण करण्यास गती देऊन परभणीस जोडणाऱ्या जिंतूर, नांदेड व िहगोली दरम्यान चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्याची मागणी आमदार दुर्राणी यांनी सचिवांना पाठविलेल्या पत्रात केली.