नांदेड-लोहा या प्रमुख रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने रस्त्यालगतचे मालमत्ताधारक ‘मालामाल’ होणार आहेत. शिवाय खड्डय़ांनी त्रस्त झालेल्या वाहनचालकांनाही दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने या कामासाठी नुकतेच तब्बल ५६ कोटी रुपये मंजूर केले.
नांदेड-लातूर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गावरील लोह्यापर्यंत खड्डेच खड्डे झाले आहेत. रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारकडे निधीची वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु सरकारने ‘छदाम’ही देण्याचे सौजन्य दाखवले नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारचे अधिकारी नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. अत्यंत गोपनीय झालेल्या या दौऱ्यात त्यांचे रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यात आले.
आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी या रस्त्याचे चौपदरीकरण होणे किती गरजेचे आहे, हे संबंधित अधिकाऱ्यांना पटवून दिले. त्यांनी या बाबत पाठपुरावाही केला. त्यास आता यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत नांदेड-लोहा या ४० किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे ‘बांधा-वापरा व हस्तांतरित करा’चा प्रयोग नसल्याने वाहनचालकांना पथकरही द्यावा लागणार नाही. नांदेड-लोहा रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने रस्त्यालगत असलेल्या मालमत्ताधारकांनाही मोठा फायदा होणार आहे.
नवीन भूसंपादन कायद्यानुसार एखाद्या मालमत्ताधारकाची मालमत्ता संपादित केल्यानंतर त्याला घसघशीत मावेजा मिळणार आहे. शिवाय रस्त्याच्या कामाला केंद्राचा पसा असल्याने मावेजाही विहित मुदतीत मिळेल. केंद्राकडून निधी मिळाल्यानंतर राज्य सरकारने आता लोहा शहरातून पर्यायी (बायपास) रस्त्याच्या कामाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. ही मान्यता देताना सरकारने जि. प., तसेच अन्य शासकीय रस्ते, पांदण रस्ते वापरात घ्यावेत, अशी अट घातली आहे.
नांदेड-लोहा मार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, येत्या आठवडाभरात निविदेची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या रस्त्यामुळे वाहनचालकांना तर दिलासा मिळणारच आहे, शिवाय काही मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकारने नांदेड जिल्ह्यातले वेगवेगळे दोन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड लोहा रस्त्यासाठी ५६ कोटी रुपये देताना असर्जन ते काबरानगर जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलासाठीही ३५ कोटींची तरतूद केली आहे.
आंध्रप्रदेश-कर्नाटकला जोडणाऱ्या नांदेड-देगलूर या रस्त्याचे चौपदरीकरण झाले; पण मरखेलपर्यंत चौपदीकरण करण्यात यावे, या साठी काँग्रेसच्या तीन सत्ताधारी आमदारांसह एका अन्य लोकप्रतिनिधीनेही प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. शिवाय या रस्त्यावर तीन पथकर असल्याने नागरिकांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. कोणताही गाजावाजा न करता पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून आणल्याबद्दल लोहा-कंधारमधील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.