पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रोडरोलरला मोटार धडकल्याने झालेल्या अपघातात मालेगाव येथील एकाच कुटुंबातील चार जण ठार तर सहा जण जखमी झाले. चालकास डुलकी लागल्याने त्याचा मोटारीवरील ताबा सुटून हा अपघात पहाटे चार वाजता झाला.     
रामराव शिंदे (६०), नलिनी शिंदे (५०), कविता शिंदे (२५), राज शिंदे (३) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.  जखमींपैकी समाधान, सुवर्णा व प्रियंका यांच्यावर येथील सीपीआर इस्पितळात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण जळकू (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील आहेत. शिंदे कुटुंबीय सोमवारी देवदर्शनासाठी निघाले होते. सोमवारी मध्यरात्री पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओमधून निघाले होते. किणी टोल नाक्याजवळ आल्यानंतर चालक समाधान शिंदे याने आपल्याला झोप येत असल्याचे सांगितले. पण कोल्हापूर जवळच असल्याने नातेवाइकांनी तेथे गेल्यानंतर झोप असे त्याला सांगितले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शिरोली औद्योगिक वसाहतीतून जात असताना चालक शिंदे यांची झोप अनावर झाली. त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी मुख्य रस्ता सोडून खाली असलेल्या सव्‍‌र्हिस रोडवर  जाऊन रोडरोलरवर जोराने आदळली.