महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावला होता. तो चार नगरसेवकांनी झुगारल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नगरसेवकांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिशिर सावंत यांनी दिली आहे. या चौघांचे नगरसेवकपद रद्द व्हावे, यासाठी कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी दिली.
दरम्यान या कारवाईने पक्षाचे महानगरपालिकेतील अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेल्या चौघांमध्ये मनपाच्या स्थायी समितीचे सभापती तथा मनपातील पक्षाचे गटनेते गणेश भोसले, किशोर डागवाले, वीणा बोज्जा आणि सुवर्णा जाधव यांचा समावेश आहे.