खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील मुडी प्र डोंगरी गावात घडली. या प्रकरणी संशयित चार सावकारांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्णाातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले.
दिनेश बडगुजर या शेतकऱ्याने शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.  नातेवाईकांनी त्याला तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला असता हा प्रकार उघड झाला. त्यात गावातील गुलाब बडगुजर, नारायण पाटील, संजय पाटील, भागवत बडगुजर या खासगी सावकारांनी आपली साडे तीन बिघे शेतजमीन स्वत:च्या नावावर करुनही पैशांचा तगादा सुरू ठेवल्याचे म्हटले आहे.
संबंधितांच्या जाचाला आणि कर्जाला कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच संबंधितांकडे सावकारीचा अधिकृत परवाना नसताना त्यांचा व्यवसाय सुरू असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.