रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी करोनाचे आणखी चार रूग्ण आढळले आहेत. त्यामध्ये तीनजण मुंबईतून येथे आलेले आहेत, तर एक नर्सिंगची विद्यार्थिनी आहे.

रत्नागिरी शहरातील रुग्ण नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी आहे. गेल्या महिन्यात राजिवडा आणि साखरतर येथे पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांच्या भागात तिने सर्वेक्षणाचे काम केले होते. गेल्या मंगळवारी तिला ताप, सर्दीची लक्षणे दिसू लागल्यामुळे विलगीकरणात ठेवून तिचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील तिच्या संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थिनींचे नमुने घेण्यात आले आहेत. सुमारे १९ जण तिच्या संपर्कात आल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले.

खेड तालुक्यातील बहिरवली गावाचा रहिवासी असलेल्या एका तरूणाला तीन साथीदारांसह मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ चेक पोस्ट येथे ५ मे रोजी ताब्यात घेऊन मंडणगड येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तो तरुण अन्य सहकाऱ्यांसमवेत ठाणे घोडबंदर परिसरातून पायी चालत आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतून एक तरूण आणि त्याची पत्नी आजारी आईला घेऊ न दापोली तालुक्यात माटवण येथे गेल्या ३० एप्रिलला आले होते. त्या माहिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर तिला करोनाचा प्रादूर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर संबंधित महिला, तिचा मुलगा आणि सुनेला रत्नागिरीच्या जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. रत्नागिरीतून त्या महिलेच्या मुलाचा व सुनेचा स्वॅब तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले. त्यात मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह, तर सुनेचा निगेटीव्ह आला आहे. मुलगा करोनाबाधित झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

या नव्या रूग्णांमुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या २१वर पोहचली असून त्यापैकी ५ पूर्वीच बरे होऊ न घरी गेले आहेत, तर एकजणाचा मृत्यू ओढवला आहे. या पाचजणांपैकी ४ तब्लिगी जमातीच्या कार्यक्रमाशी संबंधित, तर एकजण दुबईहून आलेला होता. शुक्रवारी सापडलेल्या ४ रूग्णांसह १५ जणांवर उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त झाला होता. पण गेल्या  ६ दिवसांत जिल्ह्यात रूग्णांची संख्या अचानक वाढली असली तरी हे सर्वजण मुंबई-ठाण्यातून बेकायदेशीरपणे येथे आलेले आणि विलगीकरणात ठेवलेले आहेत. नर्सिंगची विद्यार्थिनी वगळता एकही स्थानिक नाही.  ती विद्यार्थिनी येथील राजीवडा भागात आरोग्य सर्वेक्षणासाठी गेलेल्या चमूची सदस्य होती.