जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आठपैकी चार रुग्ण करोनामुक्त झाले. त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. चौघांना गुरूवारी सकाळी टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत रूग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या आता ६५ झाली आहे.

महापौर चंद्रकांत सोनार, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाने, आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी तथा करोनाचे जिल्हा प्रमुख अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी यावेळी उपस्थित होते. करोनामुक्त झालेल्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या रुग्णांना फळांनी भरलेली परडी भेट देण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी यादव यांनी ही घटना निश्चितच प्रेरणादायी असून त्यामुळे योग्य वेळी उपचार घेतल्यास रुग्ण करोनामुक्त होऊ शकतो, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचला असल्याचे त्यांनी सांगितले. कोणीही घाबरून जावू नये. करोना आजाराची प्रारंभिक लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तत्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आरोग्य विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहे. त्यांना नागरिकांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. नागरिकांनी टाळेबंदीचे नियम, शारीरिक अंतर पथ्य, मास्क वापरणे या सवयी पाळल्यामुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासनास यश आले आहे.

बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनी आपली माहिती स्थानिक प्रशासनाला तत्काळ द्यावी. त्यामुळे प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल. प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी यापुढेही सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले. महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रत्येकाने दक्षता बाळगावी, असे आवाहन केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती दिली.

धुळ्यात जुने जिल्हा रुग्णालयातून करोनामुक्त होऊन बाहेर पडणाऱ्यांचे स्वागत करतांना जिल्हाधिकारी संजय यादव, शल्य चिकित्सक डॉ.माणिकराव सांगळे, करोनाविषयक प्रमुख अधिकारी डॉ.विशाल पाटील आदी. (छाया- विजय चौधरी)