मुंबईतील धारावीतून आलेल्या २२ प्रवाशांपैकी एका महिलेची करोना चाचणी सकारात्मक आली असून दिवसभरामध्ये चार नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ८२ वर पोहोचली असून सध्या ३४ रुग्ण उपचारासाठी मिरजेतील करोना रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आतापर्यंत ४६ रुग्ण करोनामुक्त झाले असून २ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील पंधरा वर्षांचा तरुण समाविष्ट असून तो मुंबईहून आला आहे. तर खिरवडे तालुका शिराळा येथील मुंबईहून आलेल्या ५६ वर्षे पुरुषाचाही यात समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे बाधित असणाऱ्या रुग्णाचा २२ वर्षीय मुलालाही करोना संसर्ग झाल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले.

मुंबईतील धारावी ते मालगाव बस प्रवास केलेल्या सर्व २२ लोकांना विलगीकरण करण्यात येऊन त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. या मधील २० जणांचा करोना चाचणी अहवाल नकारात्मक आला असून एक ७५ वर्षीय महिला करोनाबाधित ठरली आहे. तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे. करोनाबाधित रुग्णापैकी सद्यस्थितीत तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर  कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द च्या दोन तर जत तालुक्यातील अंकले येथील एक रुग्ण करोनामुक्त झाल्याचे करोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. उपचार सुरू असताना मृत्यू झालेल्या विटा आणि सांगलीतील लक्ष्मीनगर येथील संशयित रुग्णांचा करोना चाचणी अहवाल नकारात्मक आला असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.