बंधाऱ्यात बुडून चार बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील चास येथे सोमवारी दुपारी घडली.
चास येथील सुदाम खैरनार यांच्या घरी त्यांच्या बहिणींच्या तीन मुली आल्या होत्या. सोमवारी दुपारी जेवणानंतर दोनच्या सुमारास या मुली आतेबहीण वनिता सुदाम खैरनार (१६) हिच्यासह चास-नांदूर रस्त्यावरील गोपालदरा बंधारा परिसरात फिरण्यासाठी गेल्या. परिसरात थोडा वेळ फेरफटका मारल्यानंतर त्यांना बंधाऱ्यात उतरण्याची इच्छा निर्माण झाली. बंधाऱ्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात वनितासह मंगला जालिंदर जाधव (१४, रा. चास), रोहिणी गीताराम शिरसाट (१४, रूई ता. राहाता) आणि कविता शरद रक्ताटे (२१, कोकमठाण ता. कोपरगाव) या चौघी बंधाऱ्यात बुडाल्या. त्यांच्याबरोबर फिरण्यासाठी गेलेली परंतु पाण्यात न उतरलेल्या दीपाली सुनील खैरनार या मुलीने चौघींना बुडताना पाहून त्यांच्या नातेवाईकांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. त्यांनी बंधाऱ्यात शोध घेतला असता चौघींचे मृतदेह सापडले. यापैकी रोहिणी आणि कविता या सख्ख्या बहिणी असून कविताचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या मृत्यू प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.