कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळलेल्या चार शेतकऱ्यांनी चार दिवसात आत्महत्या केल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या. तीन दिवसांपूर्वी पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याने जिल्हा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या.
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. बुधवारी गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील धनगर वस्तीवर राहणाऱ्या बबन किसन केकान (वय ३२) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. उसनवारीसह बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत बबन केकान यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. बीड तालुक्यातील िपपळनेर येथील शेतकरी विठ्ठल सुखदेव चादर (वय ४०) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून रविवारी पेटवून घेतले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी आत्महत्येच्या दोन घटनांनंतर गेवराई तालुक्यातीलच एरंडगाव येथील अंजाभाऊ गोपीनाथ लाखे (वय ६०) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेत, तर पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा येथील शेतकरी लहू तुकाराम देवकर यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सततच्या नापिकीमुळे शेतातील उत्पन्नात झालेली घट आणि बँकेसह खासगी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून देवकर यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.