चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर भिवकुंड नाला, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व सन्मित्र सैनिकी विद्यालयामागील जंगलात तब्बल २० लोखंडी फासे लावून वाघिणीची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती वनखात्याच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान, आज नरसय्या मामीडवार, येलय्या मामीडवार, शंकर मामीडवार व मधुकर या चार आरोपींना अटक करून जंगलातून व आरोपींकडून लोखंडी फासे, वाघिणीचे चार पंजे, दात, मिशा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप वडेट्टीवार यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर एकेक घटनाक्रम समोर येत आहे. कालपर्यंत या शिकार प्रकरणी सुनील पून व सावन लक्ष्मण तोरम या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना वन व पोलिस खात्याने  बोलते केल्यावर त्यांनी अन्य आरोपींची नावे व शिकारीचे घटनास्थळ दाखविले. त्यानंतर आज लालपेठ येथील मामीडवार कुटुंबातील तिघांसह चौघांना अटक केली. या चौघांनाही भिवकुंड नाला परिसरात वाघिणीचे वास्तव्य असल्याची माहिती असल्याने तीन महिन्यांपूर्वी भिवकुंड नाला, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ते सन्मित्र सैनिकी विद्यालयामागील जंगलात त्यांनी एक दोन नव्हे, तर तब्बल २० लोखंडी फासे लावले होते. यानंतर ते नियमित जंगलात जाऊन पाहणी करायचे. एके दिवशी वाघीण लोखंडी फासात अडकली. यातून सुटण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केल्याने तिच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापती झाल्या. अशाही स्थितीत लोखंडी फास तोडून ती चंद्रपूर वन विभागाच्या नियमित जंगलापर्यंत आली आणि तेथेच तिचा मृत्यू झाला. यावेळी हे चौघेही तिच्या मार्गावरच होते. वाघिणीचा मृत्यू होताच जंगलातच तिचा मृतदेह लपवून नंतर तिची कातडी, पाय, मुंडके, शेपटी, असे तुकडे करून तिची विल्हेवाट लावण्यात आली. या सहाही आरोपींसोबत वनाधिकारी हिरे, वडेट्टीवार, धोत्रे व अहिरे यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी सातपासून सारे जंगल पिंजून काढल्यावर ठिकठिकाणी लावलेले २० लोखंडी फासे जप्त केले. वाघीण एका फासातून निसटली की, दुसऱ्या फासात अडकेल, याच उद्देशाने ते लावले होते, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.
दरम्यान, विसापूर येथील विजय वैद्य व अन्य काही आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, या शिकाऱ्यांनी वाघिणीसोबतच यापूर्वी आणखी काही वन्यप्राण्यांची शिकार केली आहे. वनखाते त्याचाही शोध घेत असून, मामीडवार याच्या लालपेठ व रैयतवारी कॉलरी परिसरातील निवासस्थानी छापे मारून मोठय़ा प्रमाणात अवजारे व आरोपींकडूनही काही अवजारे व शस्त्रे जप्त करण्यात आले असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. वाघिणीची कातडी अजून सापडलेली नाही. आरोपींनी ती जंगलात गाडून ठेवली असावी किंवा विजय वैद्यकडे दिली असावी, असा संशय आहे. आरोपी मामीडवार शिकारीत व फासे लावण्यात तज्ञ आहे. मामीडवार व पून या दोघांमध्ये वाघिणीच्या हाडांचा सौदा केवळ ३० हजार रुपयात झालेला होता. त्यानंतर पून २२ लाखात १९ किलो हाडे विकण्याच्या तयारीत होता. दरम्यान, अटक केलेल्या चौघांनाही उद्या न्यायालयात हजर करून वन कोठडीची मागणी करणार आहे.