समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीकडे लक्ष

राखी चव्हाण, नागपूर</strong>

जंगलालगतचे राष्ट्रीय महामार्ग आणि जंगलातून जाणारे रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. खबरदारीच्या उपाययोजनांअभावी बल्लारपूर-गोंदिया रेल्वेमार्गावर दहा वर्षांत चार वाघ आणि एका बिबटय़ासह २४ वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये एकाचवेळी वाघाच्या तीन बछडय़ांच्या मृत्यू या मार्गावर झाला. याच रेल्वेमार्गाबाबत सांगायचे तर यापूर्वीदेखील तीन वेळा संबंधित विभागाला खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे या समितीच्या अहवालानंतर याबाबत पावले उचलली जातील का, हा प्रश्न कायम आहे.

भारताचा विचार केला तर रेल्वेमार्गावर सर्वाधिक मृत्यू हत्तींचे होतात. त्याचबरोबर आता वाघ, बिबट आणि इतरही वन्यप्राण्यांची संख्या वाढत चालली आहे. रेल्वे आणि वनखात्यातील समन्वयाचा अभाव त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. बल्लारपूर-गोंदिया रेल्वेमार्गावर वन्यप्राणी मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली. त्यावेळी आठ एप्रिल २०१२ मध्ये ब्रह्मपुरी वनविकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांनी दक्षिण-पूर्व रेल्वे नागपूरच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र लिहिले. कारण २००८ ते २०१२दरम्यान बिबटय़ासह दहा वन्यप्राणी मृत्युमुखी पडले होते. या पत्राची दखल घेतली गेली नाही म्हणून ३० सप्टेंबर २०१३ ला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालकांनी पुन्हा एकदा पत्र दिले. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान या मार्गावर वन्यप्राण्याच्या मृत्यूचा आलेख वाढतच राहिला. त्यावेळी चंद्रपूरच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी २१ जुलै २०१७ला मध्य रेल्वेच्या स्टेशन अधीक्षकांना पत्र लिहिले. आठ वर्षांत १७ वन्यप्राणी या मार्गावर मृत्यमुखी पडूनही त्याची दखल रेल्वेखात्याने घेतली नाही. अखेरीस स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांची भेट घेऊन समिती तयार करण्याची गळ घातली. ही समिती तयार झाली आणि नुकताच तिने अहवाल सोपवला. हा अहवाल केवळ बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गापुरता मर्यादित नाही इतरही रेल्वेमार्गासाठी लागू होणारा आहे. वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातून हे रेल्वेमार्ग जातात. अशा वेळी रेल्वेखात्याने खबरदारीच्या उपाययोजना घेणे आवश्यक ठरते.

समितीचा अहवाल

घनदाट जंगलातून जाताना प्रवासी किंवा मालवाहतुकीच्या रेल्वेचा वेग ४० किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक नसावा. वेग कमी असेल तर रेल्वेमार्गावरून जाणारा वन्यप्राणी दिसेल. त्याला हॉर्न देऊन दूर सारता येईल किंवा ब्रेक दाबून रेल्वे थांबवता येईल.

रेल्वे रुळांचे बांधकाम किंवा त्याच्या देखभालीकरिता रेल्वे कंत्राटदारांकडून रुळाच्या आजूबाजूला खड्डे केले जातात. काम झाल्यानंतर ते खड्डे बुजवले जात नाहीत. परिणामी त्यात पाणी साचते. या क्षेत्रातील वन्यप्राणी ते पाणी पिण्यासाठी येतात आणि त्याचवेळी वेगाने येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडतात. त्यामुळे काम होताच हे खड्डे बुजवायला हवे.

रेल्वेमार्गावर काही ठिकाणी वन्यप्राण्यांना जाण्यासाठी अंडरपासेस तयार करण्यात आले आहेत. मात्र, वन्यप्राण्यांकडून याचा वापर केला जात नाही. कारण हे अंडरपासेस एक तर बंद झाले आहेत आणि सहज दिसणारे नाहीत. त्यामुळे वन्यप्राण्यांना सुरक्षित जाता येईल असे नवे अंडरपासेस तयार केले जावे.

रेल्वेच्या खिडकीतून प्रवाशांद्वारे बरेचदा अन्न बाहेर फेकले जाते. रेल्वे रुळावर पडलेल्या अन्नाच्या वासाने वन्यप्राणी येतात आणि रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडतात. त्यामुळे रेल्वेरुळांची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे.

जंगलातून जाणारे रेल्वेमार्ग हा संवेदनशील मुद्दा आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्प तयार करताना त्याचाही विचार व्हायला पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र तरतूद आवश्यक असल्याचे मत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वारंवार मांडण्यात आले आहे.

बल्लारपूर ते गोंडिया मार्गावरील मृत्यू

’२७ ऑगस्ट २००८ – अस्वल

’पाच सप्टेंबर २०१० – दोन हायना

’२३ डिसेंबर २०१० – रानगवा

’२४ डिसेंबर २०१० – रानगवा

’२५ जानेवारी २०११ – रानगवा

’११ फेब्रुवारी २०१२ – नीलगाय

’२९ फेब्रुवारी २०१२ – बिबट

’सात सप्टेंबर २०१२ – हायना

’२५ सप्टेंबर २०१२ – हायना

’२१ जानेवारी २०१३ – चितळ

’१३ मार्च २०१३ – अस्वल

’१५ एप्रिल २०१३ – वाघ

’३ सप्टेंबर २०१५ – रानगवा

’८जून २०१६ – बिबटया

’१४ जुलै २०१६ – रानडुक्कर

’१८ जुलै २०१६ – पाच रानडुक्कर

’१५ नोव्हेंबर २०१८ – तीन वाघ