गेल्या दीड महिन्यात जिल्ह्य़ात चार वाघांची विषप्रयोगातून शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तीन वाघिणी आणि एका वाघाचा समावेश आहे. आठ महिन्यांत विदर्भात १२ वाघांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमावर्ती भागात मध्य चांदा वन विभागाच्या पोडसा (जुना) शिवारात शनिवारी विषप्रयोगाद्वारे वाघिणीची शिकार करण्यात आल्याचे आढळले. विशेष म्हणजे, वाघिणीच्या मृतदेहापासून शंभर मीटर अंतरावर रानडुकराचा मृतदेह सापडला. रानडुकराच्या मृतदेहावर विष टाकून वाघिणीची शिकार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ जुलै रोजी चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळ वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्यावरही विषप्रयोग करण्यात आला होता. याप्रकरणी शेतकरी पांडुरंग चौधरी याला वन विभागाने अटक केली आहे. गेल्या ४७ दिवसांत विषप्रयोगाद्वारे चार वाघांचा मृत्यू झाला.

विषप्रयोगातून झालेल्या व्याघ्र मृत्यूंना मानव-वन्यजीव संघर्षांची किनार आहे. जिल्हय़ात जंगलालगत शेती आहे. त्यामुळे जंगलातून वाघ, बिबटय़ासह इतर वन्यप्राणी शेतात येतात. शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करतात. वाघ, बिबटय़ाची या भागात मोठी दहशत आहे. हल्ल्याच्या भीतीने ग्रामस्थ शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडतात. त्यात वाघांबरोबरच ग्रामस्थांचेही बळी जात आहेत. वीजप्रवाहाचा वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठीही वापर होत आहे.