अण्णा भाऊ साठे आíथक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक व लिपिकांनी पदाचा दुरुपयोग करत मागील वर्षभराच्या कालावधीत एकूण विविध योजनांसाठी आलेल्या जवळपास साडेसहा कोटी रुपये रकमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. महामंडळाचे औरंगाबाद येथील प्रादेशिक व्यवस्थापक अनिल मस्के यांच्या तक्रारीवरून या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
 बीड येथे अण्णा भाऊ साठे आíथक विकास महामंडळ कार्यरत असून मागील काही वर्षांपासून या कार्यालयातून मातंग समाजातील तरुणांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी साहाय्यभूत कर्ज वितरणाऐवजी नवीनच ‘उद्योग’ चच्रेत आले. गरीब होतकरू तरुणांना कर्ज देण्याऐवजी समाजातील बडय़ा पुढाऱ्यांना या मंडळाकडून गाडय़ा वाटप करण्यात आल्या. तर कार्यालयातील व्यवस्थापक व लिपिकांनी थेट पदाचा दुरुपयोग करुन पसे हडप केल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशी करण्यात आली. चौकशीत महामंडळाचे जिल्हाव्यवस्थापक लक्ष्मण पांडुरंग घोटमुकले, बापुराव माधव नेटके आणि लिपिक श्रावण श्रीपती हातागळे व सचिन अशोक कांबळे या चौघांनी मिळून त्यांच्या कार्यकाळात १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत शासनाकडून आलेल्या वेगवेगळ्या योजनांसाठीच्या निधीमधील एकूण ६ कोटी ५८ लाख ६४ हजार १७८ रुपये इतक्या रकमेचा संगनमताने अपहार केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीनंतर औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल मस्के यांच्या तक्रारीवरून शनिवारी (९ मे) रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महामंडळातील चारही कर्मचाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे तपास करीत आहेत.