मध्य प्रदेशातील सिवनीच्या बलात्कारपीडित चार वर्षांच्या बालिकेचा अखेर सोमवारी रात्री उशिरा नागपुरातील केअर रुणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विविध तपासण्या करून केअर रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारांची शर्थ केली. अखेर तिची प्राणज्योत मालवली.
मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्य़ातील घनसौरमध्ये राहणाऱ्या या चार वर्षीय चिमुरडीवर दोन नराधमांनी बलात्कार केला होता. यानंतर तिला रविवारी २१ एप्रिलला रात्री नागपुरातील केअर रुग्णालयात विमानाने तातडीने आणण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तिच्या मेंदूला प्राणवायू मि़ळत नसल्यामुळे प्रकृती अतिशय गंभीर झाली. ‘अ‍ॅपनिया’सह विविध तपासण्या करण्यात आल्या. सात डॉक्टरांचा चमू तिच्यावर सतत लक्ष ठेवून होता. तीन दिवसांपूर्वी ती कोमात गेल्याने तिला कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.  
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह विविध पक्षाचे राजकीय नेते रुग्णालयाच्या संपर्कात होते. तिचा मृतदेह मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला असून उद्या शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

२४ तासांनी सापडली, पण..
या चिमुरडीचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असून ही चिमुरडी सर्वात लहान होती. १७ एप्रिलच्या सायंकाळपासून ही चिमुरडी घरातून बेपत्ता झाल्यामुळे सगळीकडे शोधाशोध केल्यावर ती कुठेच दिसली नाही. त्यामुळे घनसौर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे, गुरुवारी सकाळी घनसौरजवळील स्मशानघाटाजवळ ती सापडली.