आज महाड शहरासह तालुक्यात करोनाचे १४ नवे रुग्ण आढळून आले. महाड शहरात शुक्रवारी करोनाने मरण पावलेल्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील पाच आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले यांच्या कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. महाडमधील व्यापाऱ्याचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या व्यापाऱ्याची आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि अन्य एका सदस्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. शहराच्या नवेनगर भागात राहणारे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले यांना करोना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे स्वॅब देखील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्यांची पत्नी, एक मुलगी आणि मुलगा यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. राजेय भोसले यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. या खेरीज महाड शहरातील पानसरे मोहोल्ला, जुनी पेठ आणि साहिल नगर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा, एमआयडीसी मधील पिडिलाईट कॉलनीतील दोघांचा तर नडगांव येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान महाड शहरालगत असलेल्या करंजखोल येथील ६५ वर्षांच्या एका इसमाचा एमजीएम रुग्णालय कामोठे येथे मृत्यू झाला. हा इसम अन्य आजारच्या उपचारासाठी गेला होता.

तेथे त्याला करोनाचे निदान झाले. मात्र त्याचा पत्ता उरण येथील देण्यात आल्याने महाडमध्ये त्याची नोंद करण्यात आलेली नाही.